Saturday, January 9, 2016

वाचतानाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... छान लिहिलीय...

🌺"साद आईची"🌺

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते

              भिजून जातो पदर ,
              अन मन रिते राहाते
              कधी मधी मात्र ,
              तुझी मनीऑर्डर येते

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा

            तुझा बा होता तोवर ,
            काळ बरा गेला
            तुझी आठवण काढत ,
            उघड्या डोळ्यांनी गेला

शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला

         माझ्याही ह्रदयात फोटो,
         तुझा तू पाहून जा
         बाळा मला तुझ्या ,
         घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला

        वर्षाकाठी एक कपडा,
        पुरवून-पुरवून घातला
        सालं घातली बापाने,
        पण तुला शाळेमधी घातला

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.

         धुणी-भांडी करीन मी,
         केरकचरा भरीन मी
         पुरणपोळ्या, अळुवड्या ,
         तुझ्यासाठी रांधीन मी

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी

          तुझ्या घरची कामवाली ,
          म्हणून घेऊन जा
          पण बाळा मला
          तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले

            विसरु कशी तुला मी,
            तुझ्यामुळे आई झाले
            बाळ माझं 'कुलभूषण'
            पोरकी मी का झाले?

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

(राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment